जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र हा गर्जा जयजयकार
जय वारकरी, जय धारकरी, जय शिवबाची तलवार

जय अमुची प्राकृत वाणी
जय सप्तशतीतील गाणी
जय संत्कवी, जय पंतकवी, जय तंतकवी रसदार

जय यादववंशी राणा
जय शिवरायांचा बाणा
जय भीमथडी, जय वीरगडी, जय रांगडेच सरदार

जय रायगडाचा माथा
जय सिंहगडाचा ताठा
जय सह्यगिरी, पाताळदरी, जय सिंधुदुर्ग झुंजार

जय वऱ्हाडचे आजोळ
जय अजंठा नि वेरुळ
जय बारा मावळ, वाई जावळ, रांगडेच सरदार

जय गोमंतक रंगेल
जय कोल्हपूर रगेल
जय लाल घाट, जय तुंग घाट, जय कृष्णेची जलधार

जय तुळजा तुळजापूरची
जय मायभवानी अमुची
जय भावपंढरी, शिखर जेजुरी, जयतु देव मल्हार

जय सकल लोकमान्यांचा
जय सगळ्या सामान्यांचा
जय शेतकरी, जय कामकरी, जय स्वाभिमान साकार
 
 
गीत - वसंत बापट
संगीत -
स्वर -
 
www.aathavanitli-gani.com