मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल !
अन्‌ माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल !

मी फिरेन दूर दूर तुझिया स्वप्नांत चूर;
तिकडे पाऊल तुझे उंबऱ्यात अडखळेल !

विसरशील सर्व सर्व आपुले रोमांचपर्व
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल !

सहज कधी तू घरात लावशील सांजवात;
माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल !

जेव्हा तू नाहशील, दर्पणात पाहशील,
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल !

जेव्हा रात्री कुशीत माझे घेशील गीत,
माझे तारुण्य तुझ्या गात्रांतुन गुणगुणेल !

मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद;
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल !
 
 
गीत - सुरेश भट
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगेशकर
 
www.aathavanitli-gani.com