| निरोप माझा
कसला घेता जेथें राघव तेथें सीता ज्या मार्गी हे चरण चालती त्या मार्गी मी त्यांच्या पुढती वनवासाची मला न भीति संगे आपण भाग्य विधाता ! संगें असता नाथा, आपण प्रासादाहुन प्रसन्न कानन शिळेस म्हणतिल जन सिंहासन रघुकुलशेखर वरी बैसतां वनीं श्वापदें, क्रूर निशाचर भय न तयांचे मजसी तिळभर पुढती मागें दोन धनुर्धर चाप त्यां करीं, पाठिस भाता ज्या चरणांच्या लाभासाठीं दडलें होतें धरणीपोटीं त्या चरणांचा विरह शेवटीं - काय दिव्य हें मला सांगतां ? कोणासाठीं सदनीं राहूं ? कां विरहाच्या उन्हांत न्हाऊं ? कां भरतावर छत्रें पाहूं ? दास्य करूं का कारण नसतां ? कां कैकयि वर मिळवी तिसरा ? कां अपुल्याही मनी मंथरा ? कां छळितां मग वृथा अंतरा ? एकटीस मज कां हो त्यजितां ? विजनवास या आहे दैवीं ठाउक होतें मला शैशवीं सुखदुःखांकित जन्म मानवी दुःख सुखावें प्रीति लाभतां तोडा आपण; मी न तोडितें शत जन्मांचें अपुलें नातें वनवासासी मीही येतों जाया-पति कां दोन मानितां ? पतीच छाया, पतीच भूषण पतिचरणांचें अखंड पूजन हें आर्यांचें नारीजीवन अंतराय कां त्यांत आणितां ? मूक राहतां कां हो आतां ? कितिदा ठेवूं चरणीं माथा ? असेन चुकलें कुठें बोलतां क्षमा करावी जानकिनाथा |
||||
| गीत | - | ग. दि. माडगूळकर | ||
| संगीत | - | सुधीर फडके | ||
| राग | - | मधुवंती (नादवेध) | ||
| गीतरामायण | ||||
|
||||