राम चालले, तो तर सत्पथ
थांब सुमंता, थांबवि रे रथ

थांबा रामा, थांब जानकी
चरणधूळ द्या धरूं मस्तकीं
काय घडे हें आज अकल्पित !

रामराज्य या पुरीं यायचें
स्वप्न लोचनीं अजुन कालचें
अवचित झाले भग्न मनोरथ

गगननील हे, उषःप्रभा ही
श्रीरघुनंदन, सीतामाई
चवदा वर्षें का अस्तंगत ?

चवदा वर्षें छत्र लोपतां
चवदा वर्षें रात्रच आतां
उरेल नगरी का ही मूर्च्छित ?

कुठें लपे ती दुष्ट कैकयी ?
पहा म्हणावें हीन दशा ही
अनर्थ नच हा, तुझेंच चेष्टित

करि भरतातें नृप मातोश्री
रामा मागें निघे जयश्री
आज अयोध्या प्रथम पराजित

पिताहि मूर्च्छित, मूर्च्छित माता
सोडुन रामा, कोठें जातां ?
सवें न्या तरी नगर निराश्रित

ये अश्रूंचा पट डोळ्यांवर
कोठें रथ तो ? कोठें रघुवर
गळ्यांत रुतली वाणी कंपित
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
 
गीतरामायण
 
www.aathavanitli-gani.com