| शेवटीं करितां
नम्र प्रणाम बोलले इतुके मज श्रीराम- "अयोध्येस तूं परत सुमंता, कुशल आमुचें कथुनी तांतां पदवंदन करि माझ्याकरिंता तातचरण ते वंदनीय रे, शततीर्थांचें धाम "अंतःपुरिं त्या दोघी माता अतीव दुःखी असतिल सूता, धीर देई त्या धरुन शांतता सौख्य आमुचे सांगुन त्यांच्या शोका देई विराम "सांग माउली कौसल्येसी सुखांत सीता सुत वनवासी पूजित जा तूं नित्य अग्निशीं तुझिया श्रवणीं सदा असावा मुनिवर्घोषित साम "वडिलपणाची जाणिव सोडुनि सवतींशीं करि वर्तन जननी मग्न पतीच्या रहा पूजनीं तव हृदयाविन त्या जीवासी अन्य नसे विश्राम "राजधर्म तूं आठव आई अभिषिक्तातें गुण वय नाहीं दे भरतासी मान प्रत्यहीं पढव सुमंता, विनयाने हें, सांगुन माझे नाम "सांग जाउनी कुमार भरता हो युवराजा, स्वीकार सत्ता प्रजाजनांवर ठेवी ममता भोग सुखाचा अखंड घेई, मनिं राही निष्काम "छत्र शिरावर तुझ्या पित्याचें पाळच वत्सा, वचन तयांचें सार्थक कर त्या वृद्धपणाचें राज्य नीतिनें करुन वाढवी रघुवंशाचें नाम "काय सांगणे तुज धीमंता, उदारधी तूं सर्व जाणता पुत्रवियोगिनि माझी माता तुझ्या वर्तनें तिला भासवी भरत तोच श्रीराम" बोलत बोलत ते गहिंवरले कमलनयनिं त्या आसूं भरलें करुण दृश्य तें अजुन न सरले - गंगातीरीं-सौमित्रीसह-उभे जानकी-राम |
||||
| गीत | - | ग. दि. माडगूळकर | ||
| संगीत | - | सुधीर फडके | ||
| गीतरामायण | ||||
|
||||