| उगा कां काळिज
माझें उले ? पाहुनी वेलीवरचीं फुलें कधी नव्हे तें मळलें अंतर कधीं न शिवला सवतीमत्सर आज कां लतिकावैभव सले ? काय मना हें भलतें धाडस ? तुला न आवडे हरिणी-पाडस पापणी वृथा भिजे कां जलें ? गोवत्सांतिल पाहुन भावां काय वाटतो तुजसी हेवा ? चिडे कां मौन तरी आंतलें ? कुणी पक्षिणी पिलां भरविते दृश्य तुला तें व्याकुळ करितें काय हें विपरित रे जाहलें ? स्वतःस्वतःशीं कशास चोरी ? वात्सल्याविण अपूर्ण नारी कळालें सार्थक जन्मांतले मूर्त जन्मते पाषाणांतुन कौसल्या का हीन शिळेहुन ? विचारें मस्तक या व्यापिलें गगन अम्हांहुनि वृद्ध नाहि का ? त्यांत जन्मती किती तारका ! अकारण जीवन हें वाटलें |
||||
| गीत | - | ग. दि. माडगूळकर | ||
| संगीत | - | सुधीर फडके | ||
| गीतरामायण | ||||
|
||||