| सांवळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर न्हातो अष्टगंधांचा सुवास निळ्या कमळांना येतो सांवळा ग रामचंद्र माझ्या हातांनीं जेवतो उरलेल्या घासांसाठीं थवा राघूंचा थांबतो सांवळा ग रामचंद्र रत्नमंचकीं झोंपतो त्याला पाहतां लाजून चंद्र आभाळीं लोपतो सांवळा ग रामचंद्र चार भावात खेळतो हीरकांच्या मेळाव्यांत नीलमणी उजळतो सांवळा ग रामचंद्र करी भावंडांसी प्रीत थोरथोरांनी शिकावी बाळाची या बाळरीत सांवळा ग रामचंद्र त्याचे अनुज हे तीन माझ्या भाग्याच्या श्लोकाचे चार अखंड चरण सांवळा ग रामचंद्र करी बोबडे भाषण त्याशी करितां संवाद झालों बोबडे आपण सांवळा ग रामचंद्र करी बोबडे हें घर वेद म्हणतां विप्रांचे येती बोबडे उच्चार सांवळा ग रामचंद्र चंद्र नभींचा मागतो रात जागवितो बाई सारा प्रासाद जागतो सांवळा ग रामचंद्र उद्यां होईल तरुण मग पुरता वर्षेल देवकृपेचा वरुण |
||||
| गीत | - | ग. दि. माडगूळकर | ||
| संगीत | - | सुधीर फडके | ||
| गीतरामायण | ||||
|
||||