वेडात मराठे वीर दौडले सात !

"श्रुति धन्य जाहल्या श्रवुनि आपुली वार्ता
रण सोडुनि सेनासागर अमुचे पळता
अबलाहि घरोघर खऱ्या लाजतिल आता
भर दिवसा आम्हा दिसू लागली रात"
वेडात मराठे वीर दौडले सात !

ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील
"माघारी वळणे नाहि मराठी शील
विसरला महाशय काय लाविता जात ?"
वेडात मराठे वीर दौडले सात !

वर भिवई चढली दात दाबती ओठ
छातीवर तुटली पटबंदाची गाठ
डोळ्यांत उठे काहूर ओलावे काठ
म्यानातुन उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात !

"जरि काल दाविली प्रभु, गनिमांना पाठ
जरि काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरी-शिबिरात
तव मानकरी हा घेउनि शीर करात"
वेडात मराठे वीर दौडले सात !

ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले
सरदार सहा सरसावुनि उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषात
वेडात मराठे वीर दौडले सात !

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना
छावणीत शिरले थेट, भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात !

खालून आग, वर आग, आग बाजूंनी,
समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी,
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात !

दगडांवर दिसतिल अजुनि तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजुनि रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणि वाऱ्यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात !


कुसुमाग्रज
For the printable version of this song, click here.