सरणार कधी रण प्रभु तरी
हे कुठवर साहू घाव शिरी ?

दिसू लागले अभ्र सभोती
विदीर्ण झाली जरि ही छाती
अजून जळते आंतर-ज्योती
कसा सावरू देह परी ?

होय तनूची केवळ चाळण
प्राण उडाया बघती त्यातुन
मिटण्या झाले अधीर लोचन
खड्ग गळाले भूमिवरी

पावन-खिंडित पाउल रोवुन
शरीर पिंजेतो केले रण
शरणागतिचा अखेर ये क्षण
बोलवशिल का आता तरी ?
 
 
गीत - कुसुमाग्रज
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगेशकर
For the printable version of this song, click here.