दुभंगून जाता
जाता मी अभंग
झालो !
चिराचिरा जुळला
माझा, आत दंग
झालो !
सल जुनेच सलता
सलता सुखावून
गेले !
अन् हळूच गुणगुणती
हे वळ न मोजलेले
!
कशी कथा सरता
सरता पूर्वरंग
झालो !
किरण एक धरुनी
हाती मी पुढे
निघालो !
अन् असाच वणवणताना
मी मला मिळालो
!
सर्व संग सुटले;
माझा मीच संग
झालो !
ज्ञानदेव लिहुनी
गेले ओळओळ भाळी
!
निमित्तास माझे
गाणे, निमित्तास
टाळी !
तरू काय ? इंद्रायणिचा
मी तरंग झालो
!
कुठे दिंड गेली
त्यांची कळेना
बिचारी !
मी इथेच केली
माझी सोसण्यात
वारी !
’पांडुरंग’
म्हणता म्हणता
’पांडुरंग’
झालो !
|