हे श्यामसुंदर
राजसा, मनमोहना
विनवुनी सांगते
तुज
जाउ दे मला
परतुनी !
गाव गोकुळ दूर
राहे
दूर यमुनानीर
वाहे
हरवले मी कसे
मज
चालले कुठे
घनवनी ?
पावरीचा सूर
भिडला
मजसि माझा विसर
पडला
नकळता पाउले
मम
राहिली इथे
थबकुनी !
पानजाळी सळसळे
का ?
भिवविती रे
लाख शंका !
थरथरे, बावरे
मन
संगती सखी नच
कुणी !
|