लहान सुद्धा महान असते ठाऊक आहे तुम्हाला
इवले इवले जीवही येती मोठ्या मोठ्या कामाला !

महा भयंकर सिंव्ह एकदा गुहेमध्ये निजलेला
एक छोटासा उंदीर आला,
सिंव्हाच्या अंगावर चढुनी ओढी दाढी-मिशाला !
सिंव्ह जागला करीत गर्जना धरिला उंदीर त्याने,
म्हणे चिमुरड्या, "तुला फाडतो माझ्या या पंजाने."
थरथर कापे, उंदीर सांगे, "येईन कधितरी कामाला !"
इवले इवले जीवही येती मोठ्या मोठ्या कामाला !

( या थरथर कापणाऱ्या उंदराचा सिंव्हाने उपहास केला. तो म्हणाला, "अरे मूर्खा तू माझ्या एका घासाचाही नाहीस ! चिमुरडा तू, वनराजाच्या कसल्या कामी येणार आहेस रे ? चल, चालता हो इथून."
सुटका होताच उंदीर बिळात पळून गेला. पण एकदा काय झालं ठाऊक आहे?)

कधी एकदा सिंव्ह अडकला फसुनीया जाळ्यात
वनराजा हो केविलवाणा ये पाणी डोळ्यात !
हादरे जंगल, अशी गर्जना ऐकून उंदीर धावे
सिंव्हाला तो सांगे, "आता माझे शौर्य बघावे !
भिऊ नका हो, रडू नका हो, सोडिवतो तुम्हाला.
नका लोचनी आणू पाणी, पाळीन मी वचनाला."
सर्व शक्तीने कुरतडुनीया उंदीर तोडी जाळे
पाहून सारे मग सिंव्हाचे भरुनी आले डोळे !
जीव चिमुकला संकटकाळी अखेर कामी आला
इवले इवले जीवही येती मोठ्या मोठ्या कामाला !
 
 
गीत - शांताराम नांदगावकर
संगीत - सी. रामचंद्र
स्वर - सी. रामचंद्र
For the printable version of this song, click here.