ज्योत दिव्याची मंद तेवते,
देवघरातिल देवापाशी
मीरा नाचे कृष्णासाठी,
चित्त रंगले कृष्णापाशी

स्वप्नी ऐकते मधुर बासरी,
मीरा होते क्षणी बावरी
आणि मनाने धावत जाते,
हितगुज करिते श्रीरंगाशी

पाषाणातहि देव पाहिले,
भजनि गायनी भान हरपले
उपहासाने जग तिज हसले,
मीरा बोले तो अविनाशी

नयनी लपले रूप सावळे,
अधरी सुकले शब्द कोवळे
त्या शब्दांतुन दर्शन घडले,
मिठी मारली चरणापाशी
 
 
गीत - योगेश्वर अभ्यंकर
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर - आशा भोसले
 
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.