तू असतीस तर झाले असते
गडे उन्हाचे गोड चांदणे
मोहरले असते मौनातून
एक दिवाणे नवथर गाणे
बकुळिच्या पुष्पापरी नाजुक
फुलले असते गंधाने क्षण
अन् रंगांनी केले असते
क्षितिजावरले खिन्न रितेपण
पसरियली असती छायांनी
चरणतली मृदुशामल मखमल
अन् शुक्रानी केले असते
स्वागत अपुले हसून मिश्किल
तू असतीस तर झाले असते
आहे त्याहुनी जग हे सुंदर
चांदण्यात विरघळले असते
गगन धरेतील धूसर अंतर
गीत
-
मंगेश पाडगावकर
संगीत
-
गजानन वाटवे
स्वर
-
Gajanan Vatave & Mangesh Padgaokar