गोरी बाहुली कुठुन आली
कुशीमध्ये आईच्या ही कशी शिरली
झगा ना साडी तश्शी नागडी
चड्डीदेखील कशी हिने नाही घातली

उताणी पडे तशीच रडे
डोळ्यांत हिच्या ओल्या निळ्याचे खडे
पुशी ही धीट गालीचे तीट
कुठे बाई ठेवावी ही जपूनी नीट

कोण्या दुकानी होती ही राणी
पेटीविना तरी हिला आणली कोणी
छान रेखिले नाक डोळुले
लावयाचे केस हिला पार राहिले
आई ग आई मला ही देई
बदल्यात माझी सारी खेळणी घेई

हत्ती नी घोडे, कुत्री, माकडे
सिनेमाची पेटीसुद्दा देईन गडे
पोर लाघवी मला ही हवी
हवीतर बाबांकडे माग तू नवी
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर - आशा भोसले
चित्रपट - बोलकी बाहुली (१९६१)
For the printable version of this song, click here.