उतरली सांज
ही धरेवरी
मी उभी घेउनी
कलश करी
सांज मनी दरवळे
मनोहर
गात तरंगत जळलहरीवर
करीत व्याकुल
माझे अंतर
मज साद घालतो
परोपरी !
उरे शांतता
या पथि निर्जन
प्रेमनदीला
भरती येउन
उठती लहरी चंचल
उसळुन
ही वळति पाउले
तटावरी
येईन का मी
नाही परतुन
?
तिथेच कोणा
राहिन बिलगुन
?
वीणा वाजवि
कुणितरि मोहन
तो नाद अनोखा
घुमे उरी
|