मज नकोत अश्रू
घाम हवा
हा नव्या युगाचा
मंत्र नवा !
होते तैसी अजून
उते मी
सधन अन्नदा
सुवर्णभुमी
खंडतुल्य या
माझ्या धामी
का बुभुक्षितांचा
रडे थवा ?
अपार लक्ष्मी
माझ्या पोटी
का फिरसी मग
माझ्या पाठी
एक मूठभर अन्नासाठी,
जगतोस तरी का
भ्याड जीवा
?
काय लाविसी
हात कपाळी
फेकून दे ती
दुबळी झोळी
जाळ आळसाची
तव होळी
तू जिंक बळाने
पराभवा !
मोल श्रमाचे
तुला कळू दे
हात मळू दे,
घाम गळू दे
सुखासिनता पूर्ण
जळू दे
दैन्यास तुझ्या
हा एक दवा !
|