फुटतो पान्हा
पुन्हा पुन्हा,
कुणी तरी माझे
बाळ आणा
रेशमाचे कुंची
झबले, या हातांनी
मी शिवलेले
तसेच हाती राहुन
गेले, घालुनी
पाहू आता कुणा
?
बाळ निजेची
वेळ येते, पाळण्याची
दोरी हलते
गहिवरता मी
जो जो म्हणते,
पाळणा हले सुना
सुना
बाळ कुशीला
देण्यासाठी,
चिमणे चुंबन
घेण्यासाठी
जितुके जीवन
असेल गाठी,
देईन तुजला
दयाघना
|