खेळ मांडीयेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे ।
क्रोध अभिमान गेला पावटणी, एकएका लागतील पायी रे ॥१॥
नाचती आनंद कल्लोळा पवित्र गाणे वनमाळी रे ।
कळी कामावरी घातली काम एक एकाहुनी बळी रे ॥२॥
गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा रे ।
टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव, अनुपम्य सुखसोहळा रे ॥३॥
लुब्धली नादी लागली समाधी मुढजन नारी लोका रे ।
पंडीत ज्ञानी योगी महनुभव एकची सिद्ध साधका रे ॥४॥
वर्ण अभिमान विसरली याती, एकेका लोटांगणी जाती रे ।
निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर सुटती रे ॥५॥
होतो जयजयकार गर्जत अंबर, मातले हे वैष्णव वीर रे ।
तुका म्हणे सोपी केली पायवाट, उतरावया भवसागर रे ॥६॥
रचना
-
संत तुकाराम
संगीत
-
श्रीनिवास खळे
स्वर
-
लता मंगेशकर
राग
-
भूप
,
नट
(नादवेध)