बारा डोळ्यांनी पापं सारी नारायण बघतो
पैशासाठी माणूस मरतो पैशावर जगतो !

वासुदेवाची ऐका वाणी जगात न्हाई राम रे
दाम करी काम येड्या दाम करी काम रे !

पैशाची जादू लई न्यारी, तान्ह्या पोराला त्याची हाव
आई सोडून घेतंय्‌ झेप पैशाच्या मागूनी धाव
जल्मापासून सारी माणसं, ह्या पैशाची गुलाम रे !

कुणी जुगार, सट्टेबाज कुणी, कुणी खेळं मुंबई मटका
चांडाळ चौकडी जमवी कुणी, घेतो एकच घुटका
शर्यत घोडा चौखुर सुटला फेकला त्यानं लगाम रे !

ह्या कवडी दमडी पाई कुणी राकूस घेई जीव
कुणी डाका दरोडा घाली, कुणी जाळून टाकी गाव
बगलंमंदी सुरी दुधारी मुखी देवाचं नाम रे !

नक्षत्रावानी पोरगी बापाच्या गळ्याला फास
ठरल्यालं लगीन मोडलं हुंड्याला पैसा नसं
काळीज भरलं शीरिमंतीनं हातात नाही छदाम रे !

वाड्यात पंगती बसल्या, लई आग्रव जागोजाग
दारात भिकारी रडतो, पोटात भुकंची आग
संसाराचं ओझं घेऊन कुणी टिपावा घाम रे !

नाचते नारीची अब्रू, छन छन्नुक तालावरती
पैशानं बायको खुश, पैशानं बोलते पिरती
ह्या पैशाच्या बादशहाला दुनिया करते सलाम रे !
 
 
गीत - जगदीश खेबुडकर
संगीत - प्रभाकर जोग
स्वर - सुधीर फडके
चित्रपट - दाम करी काम (१९७१)
For the printable version of this song, click here.