स्मरशिल राधा स्मरशिल यमुना
स्मरशिल गोकुळ सारे
स्मरेल का पण कुरूप गवळण
तुज ही बन्सिधरा रे

रास रंगता नदी-किनारी
उभी राहिले मी अंधारी
नकळत तुजला तव अधरावर
झाले मी मुरली रे

ऐन दुपारी जमीन जळता
तू डोहावर शिणून येता
कालिंदीच्या जळात मिळुनी
धुतले पाय तुझे रे

मथुरेच्या त्या राजघरातुन
कुंजवनी परतता तुझे मन
उपहासास्तव तरी कधी तू
आठव करशिल का रे
 
 
गीत - वि. वा. शिरवाडकर
संगीत - पं. वसंतराव देशपांडे
स्वर - फैयाज
नाटक - वीज म्हणाली धरतीला (१९७०)
For the printable version of this song, click here.