आज राणी, पूर्विची ती प्रीत तू मागू नको
कालचे वेड्या फुलांचे, रंग तू मागू नको

सांजता चाफ्याकळीचे चुटपुटीचे भेटणे
पानजाळीतून झिरपे, बावरेसे चांदणे
त्या क्षणांचे, चांदण्यांचे स्पर्श तू मागू नको

पाकळ्यांचे शब्द होती, तू हळू निःश्वासता
वाजती गात्री सतारी, नेत्रपाती झाकता
त्या फुलांचे, त्या स्वरांचे, गीत तू मागू नको

रोखूनी पलकांत पाणी, घाव सारे साहीले
अन्‌ सुखाच्या आसवांचे, मीठ डोळा साचले
या घडीला मोतियाचा घास तू मागू नको

काय बोलू श्वासभारे चांदणे डहूळेल का ?
उमलण्याचे सुख फिरुनी, या फुला सोसेल का ?
नीत नवी मरणे मराया, जन्म तू मागू नको
 
 
गीत - वा. रा. कांत
संगीत - यशवंत देव
स्वर - सुधीर फडके
 
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.