वादलवारं सुटलं
गो
वाऱ्यानं तुफान
उठलं गो
भिरभिर वाऱ्यात
पावसाच्या माऱ्यात
सजनानं होडीला
पान्यात लोटलं
वादलवारं सुटलं
गो !
गडगड ढगांत
बिजली करी
फडफड शिडात
धडधड उरी
एकली मी आज
घरी बाय
संगतीला माझ्या
कुनी नाय
सळसळ माडांत
खोपीच्या कुडात
जागनाऱ्या डोल्यांत
सपान मिटलं
वादलवारं सुटलं
गो !
सरसर चालली
होडीची नाळ
दूरवर उठली
फेसाची माळ
कमरेत जरा वाकूनिया
पान्यामंदी
जालं फेकूनिया
नाखवा माजा
दर्याचा राजा
लाखाचं धन त्यानं
जाल्यात लुटलं
वादलवारं सुटलं
गो !
|