आला पाऊस मातीच्या वासात ग
मोती गुंफीत मोकळ्या केसांत ग !

आभाळात आले काळे काळे ढग
धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत ग !

कोसळल्या कशा सरीवर सरी
थेंब थेंब करी नाच पाण्यावरी
लाल ओहळ वाहती जोसात ग !

लिंबोळ्यांची रास कडूलिंबाखाली
वारा दंगा करी जुई शहारली
चाफा झुरतो फुलांच्या भासात ग !

झाडांवरी मुके पाखरांचे थवे
वीज लालनिळी कशी नाचे लवे
तेजाळते उभ्या अवकाशात ग !

वीज कडाडता भय दाटे उरी
एकली मी इथे सखा राहे दुरी
मन व्याकूळ सजणाच्या ध्यासात ग !
 
 
गीत - शांता शेळके
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर - पुष्पा पागधरे
For the printable version of this song, click here.   
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.