भस्मविलेपित
रूप साजिरे
आणुनिया चिंतनी
अपर्णा तप करिते
काननी !
वैभवभूषित वैकुंठेश्वर
तिच्या पित्याने
योजियला वर
भोळा शंकर परी
उमेच्या भरलासे
लोचनी !
त्रिशूल डमरू
पिनाकपाणी
चंद्रकला शिरि
सर्प गळ्यातुनि
युगायुगांचा
भणंग जोगी तोच
आवडे मनी !
कोमल सुंदर
हिमनगदुहिता
हिमाचलावर तप
आचरिता
आगीमधुनी फूल
कोवळे फुलवी
रात्रंदिनी
!
|