जन पळभर म्हणतिल
’हाय हाय’ !
मी जाता राहिल
कार्य काय ?
सूर्य तळपतिल,
चंद्र झळकतिल,
तारे अपुला
क्रम आचरतिल,
असेच वारे पुढे
वाहतिल,
होईल काहि का
अंतराय ?
मेघ वर्षतिल,
शेते पिकतिल,
गर्वाने या
नद्या वाहतिल,
कुणा काळजी
की न उमटतिल,
पुन्हा तटावर
हेच पाय ?
सखेसोयरे डोळे
पुसतिल,
पुन्हा आपुल्या
कामि लागतिल,
उठतिल, बसतिल,
हसुनि खिदळतिल
मी जाता त्यांचे
काय जाय ?
रामकृष्णही
आले, गेले !
त्याविण जग
का ओसचि पडले
?
कुणी सदोदित
सूतक धरिले
?
मग काय अटकले
मजशिवाय ?
अशा जगास्तव
काय कुढावे
!
मोहि कुणाच्या
का गुंतावे
?
हरिदूता का
विन्मुख व्हावे
?
का जिरवु नये
शांतीत काय
?
|