उंचनिंच कांहीं
नेणे भगवंत
।
तिष्ठे भाव
भक्ती देखोनियां
॥१॥
दासीपुत्र कण्या
विदुराच्या
भक्षी ।
दैत्या घरीं
रक्षी प्रल्हादासी
॥२॥
चर्म रंगूं
लागे रोहिदासा
संगे ।
कबिराचे मागे
विणी शेले
॥३॥
सजनकसाया विकुं
लागे मास ।
मळा सांवत्यास
खुरपूं लागे
॥४॥
नरहरिसोनारा
घडों फुकुं
लागे ।
चोख्यामेळ्या
संगे ढोरें
ओढी ॥५॥
नामयाच्या जनी
सवे वेची शेणी
।
धर्मा घरीं
पाणी वाहे झाडी
॥६॥
नाम्यासवें
जेवी नव्हे
संकोचित ।
ज्ञानियाची
भिंत अंगीं
ओढी ॥७॥
अर्जुनाचीं
घोडीं हाकी
हा सारथी ।
भक्षी पोहे
प्रीती सुदाम्याचे
॥८॥
गौळियांचे घरीं
अंगे गाइ वळी
।
द्वारपाळ बळी
द्वारीं जाला
॥९॥
यंकोबाचें ऋण
फेडी हृषिकेशी
।
आंबऋषीचे सोशी
गर्भवास ॥१०॥
मीराबाइं साठी
घेतो विषप्याला
।
दामाजीचा जाला
पाडेवार ॥११॥
घडी माती वाहे
गो-या कुंभाराची
।
हुंडी मेहत्याची
अंगे भरी ॥१२॥
पुंडलिकासाठीं
अजुनि तिष्ठत
।
तुका म्हणे
मात धन्य त्याची
॥१३॥ |