अंध बिचारी
मी जरी बाला
पाहिले न कधी
शशीसूर्याला
वाण नसे परी
आनंदाला
कारण अंध अशि
मी बाला ॥
कळ्या फुलांचा
रंग तजेला
कसा दिसावा
अभागिनीला
परी ते देती
सुगंध मजला
कारण अंध अशि
मी बाला ॥
पक्षांच्या
नभी उडत्या
लीला
कुठुन पहाणे
या जन्माला
मला ऐकविती
परी गानाला
कारण अंध अशि
मी बाला ॥
प्रेमाचे मधुबोल
हे जगीं
देवाची अंधास
देणगी
सकल बोलती प्रेमळ
बोला
कारण अंध अशि
मी बाला ॥ |