काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही
देवळाच्या दरामध्ये, भक्ती तोलणार नाही

माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे
पण पाकळी तयाची, कधी फुलणार नाही

नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गूज
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही

मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही

दूर बंदरात उभे एक गलबत रूपेरी
त्याचा कोष किना-यास कधी दिसणार नाही

तुझ्या कृपाकटक्षाने झालो वणव्याचा धनी
त्याच्या निखा-यात कधी तुला जाळणार नाही
 
 
गीत - कुसुमाग्रज
संगीत - यशवंत देव
स्वर - श्रीधर फडके
 
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.