जीवनगाणे गातच रहावे
झाले गेले विसरुनि जावे, पुढे पुढे चालावे
जीवनगाणे गातच रहावे !
सात सुरांचा हा मेळा व्यापुन उरला विश्वाला
हृदय हालता वरखाली ताल मिळे या गाण्याला
तुमच्या माझ्या श्वासांमधुनी आकारा यावे
जीवनगाणे गातच रहावे !
चिमणाबाई हिरमुसली गाल फुगवुनी का बसली ?
सान बाहुली ही इवली लटकी लटकी का रुसली ?
रुसली रुसली, खुदकन हसली, पापे किति घ्यावे !
जीवनगाणे गातच रहावे !
मातीमधुनी अंकुरली चैतन्याची दीपकळी
आनंदाने थरथरली कधी अंतरी गहिवरली
या प्रीतीला, या मातीला हितगुज सांगावे
जीवनगाणे गातच रहावे !
गीत
-
शांता शेळके
संगीत
-
राम-लक्ष्मण
स्वर
-
उषा मंगेशकर
,
महेंद्र कपूर
चित्रपट
-
आपली माणसं (१९७९)