सूर मागू तुला
मी कसा ?
जीवना तू तसा,
मी असा !
तू मला, मी
तुला पाहिले
एकमेकांस न्याहाळिले
दुःख माझातुझा
आरसा !
एकदाही मनासारखा
तू न झालास
माझा सखा
खेळलो खेळ झाला
जसा !
खूप झाले तुझे
बोलणे
खूप झाले तुझे
कोपणे
मी तरीही जसाच्या
तसा !
रंग सारे तुझे
झेलुनी
शाप सारे तुझे
घेउनी
हिंडतो मीच
वेडपिसा !
काय मागून काही
मिळे ?
का तुला गीत
माझे कळे ?
व्यर्थ हा अमृताचा
वसा !
|