हसले आधी कुणी ? तू का मी ?

सहज तुला मी रे सख्या पाहिले
तू बघता मी ग तुला पाहिले
त्या पाहण्याचे वेड लागता
त्या वेडाचा तू अर्थ सांगता
हसले आधी कुणी ? तू का मी ?

अवचित तुझी रे भेटची होता
पदर सावरी ढळला नसता
बिजली परी मी निघूनी जाता
मागे वळूनी तू हळूच पाहता
हसले आधी कुणी ? तू का मी ?

नाही भेटले बळेच तुजला
कळले सखये जेव्हा मजला
परस्परावरी रुसता फुगता
जवळ येऊनी दूरची सरता
हसले आधी कुणी ? तू का मी ?
 
 
गीत - पी. सावळाराम
संगीत - वसंत देसाई
स्वर - आशा भोसले, तलत मेहमूद
चित्रपट - मोलकरीण (१९६३)
For the printable version of this song, click here.