धुंद एकांत हा, प्रीत आकारली
सहज मी छेडिता, तार झंकारली

जाण नाही मला, प्रीत आकारली
सहज तू छेडिता, तार झंकारली

गंधवेडी कुणी, लाजरी, बावरी
चांदणे शिंपिते चैत्रवेलीवरी,
यौवनाने तिला, आज शृंगारली

गोड संवेदना, अंतरी या उठे
फूल होता कळी, पाकळी ही मिटे
लोचनी चिंतनी, मूर्त साकारली

रोमरोमांतुनी, गीत मी गाइले
दाट होता धुके , स्वप्न मी पाहिले
पाहता पाहता, रात्र अंधारली

आज बाहुत या, लाज आधारली
सहज तू छेडिता, तार झंकारली
 
 
गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - आशा भोसले, सुधीर फडके
चित्रपट - अनोळखी (१९७३)
 
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.