माझ्या मातीचे
गायन, तुझ्या
आकाश श्रुतीनी
जरा कानोसा
देऊन, कधी ऐकशील
का रे
माझी धुळीतील
चित्रे, तुझ्या
प्रकाश नेत्रांनी
जरा पापणी खुलून,
कधी पाहशील
का रे
माझ्या जहाजाचे
पंख, मध्यरात्रीत
माखले
तुझ्या किनाऱ्यास
दिवा, कधी लावशील
का रे
माझा रांगडा
अंधार, मेघामेघात
साचला
तुझ्या उषेच्या
कानी, कधी टिपशील
का रे
|