सांज रंगात रंगून जाऊ, ये प्रिये हा दुरावा कशाला
मलमली रात येऊ दे थांब ना, चांदण्याचा घेऊन झुला

नभ फुलले, ढग झुलले, सागराच्या किनाऱ्यास खग भुलले
स्वप्नगंधात न्हाऊन आली धरा, अंग अंगे सुखाचाच वाहे झरा
आज आनंद पाना फुलाला
गोजिरे प्रितीचे गीत गाऊ, लेउनी चांदव्याची दुशाला

एक गाणे मनी या फुलपंखी, आळवीते तुझी आज मधुवंती
शब्द माझे तुझी ही मधुगितीका, त्या स्वरातून उमले जणू प्रितीका
पश्चिमेला नवा रंग आला
त्याच रंगात रंगून जाऊ, ये प्रिये हा दुरावा कशाला

स्वर जुळता, मन मिळता, रोमरोमी सतारीच झंकारती
या सुखाने आता प्राण ओलावले, पापण्यांना तुझे ओठ हे स्पर्षले
मिलनाचा असा सोहळा
गोजिरे प्रितीचे गीत गाऊ, लेऊनी चांदव्याची दुशाला
 
 
गीत - शांताराम नांदगावकर
संगीत - प्रभाकर जोग
स्वर - अनुराधा पौडवाल, अरुण दाते
For the printable version of this song, click here.