धुंद येथ मी स्वैर झोकितो मद्याचे प्याले
याच वेळि तू असशिल तेथे बाळा पाजविले

येथ विजेचे दिवे फेकती उघड्यावर पाप
ज्योत पणतिची असेल उजळित तव मुख निष्पाप
माझ्या कानी घुमती गाणी, मादक मायावी
ओठांवरती असेल तुझीया अमृतमय ओवी

माझ्यावरती खिळली येथे विषयाची दृष्टी
मत्पूजेस्तव असशिल शोधित सखे, स्वप्नसृष्टी
कनकांगीच्या मत्त चुंबने जाग मला आली
विरहाश्रू तव असेल झरला सुकलेल्या गाली

तुझे नि माझे अंतर व्हावे कसे एकरूप ?
शीलवती तू पतिव्रते, मी मूर्तीमंत पाप !
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - सुधीर फडके
 
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.