मधु मागसी माझ्या सख्या, परी
मधुघटचि रिकामे पडती घरी !

आजवरी कमळाच्या द्रोणी
मधु पाजिला तुला भरोनी,
सेवा ही पुर्विची स्मरोनी,
करी न रोष सख्या, दया करी.

नैवेद्याची एकच वाटी,
अता दुधाची माझ्या गाठी;
देवपुजेस्तव ही कोरांटी
बाळगी अंगणी कशी तरी.

तरुण-तरुणिंची सलज्ज कुजबुज
वृक्षझऱ्यांचे गूढ मधुर गुज
संसाराचे मर्म हवे तुज
मधु पिळण्या परि बळ न करी !

ढळला रे ढळला दिन सखया !
संध्याछाया भिवविति हृदया,
आता मधुचे नाव कासया ?
लागले नेत्र हे पैलतिरी.
 
 
गीत - भा. रा. तांबे
संगीत - वसंत प्रभू
स्वर - लता मंगेशकर
राग - भीमपलास (नादवेध)
For the printable version of this song, click here.