जय शारदे वागीश्वरी
विधिकन्यके विद्याधरी

ज्योत्सनेपरी कांती तुझी
मुख रम्य शारद चंद्रमा
उजळो तुझ्या हास्यातुनी
चारी युगांची पौर्णिमा
तुझिया कृपेचे चांदणे
नित वर्षु दे अमुच्या शिरी !

वीणेवरी फिरता तुझी
चतुरा कलामय अंगुली
संगीत जन्मा ये नवे
जडता मतीची भंगली
उन्मेष कल्प तरुवरी
डवरुन आल्या मंजिरी !

शास्त्रे तुला वश सर्वही
विद्या, कला वा संस्कृती
स्पर्शामुळे तव देवते
साकारती रुचिराकृती
लावण्य काही आगळे
भरले दिसे विश्वान्तरी !
 
 
गीत - शांता शेळके
संगीत - श्रीधर फडके
स्वर - आशा भोसले
For the printable version of this song, click here.