ही कुणी छेडिली तार
प्राजक्ताच्या मधुगंधासम
कुठुनी ये केदार !

तूच छेड ती, तूच ऐक ती
आर्त सुरावट तुझ्याच हाती
स्पर्षावाचून तूच छेडिसी
माझी हृदयसतार !

जागृत मी का, आहे स्वप्नी
श्रवण पडे पण दिसे न नयनी
स्वप्नातच का मजसी बोलले
माझे राजकुमार !

स्वप्नासम मज झाले जीवन
स्वप्न ही निरस, सखी तुझ्यावीण
अर्ध्या रात्री शोधीत आलो
तुझे प्रियतमे दार !

वेलीवर त्या नका चढू नका
चढा सूर नच लवे गायका
तूच चढविला तारस्वर हा
तूच तोड ही तार !
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - पु. ल. देशपांडे
स्वर - आशा भोसले, पं. वसंतराव देशपांडे
चित्रपट - गुळाचा गणपति (१९५३)
राग - केदार (नादवेध)
For the printable version of this song, click here.