गे मायभू तुझे
मी फेडीन पांग
सारे;
आणीन आरतीला
हे सूर्य, चंद्र,
तारे.
आई, तुझ्यापुढे
मी आहे अजून
तान्हा;
शब्दात सोड
माझ्या आता
हळूच पान्हा.
आई, तुझ्यापुढे
ही माझी व्यथा
कशाला ?
जेव्हा तुझ्यामुळे
ह्या जन्मास
अर्थ आला !
मी पायधूळ घेतो
जेव्हा तुझी
जराशी,
माझी ललाटरेषा
बनते प्रयागकाशी
!
आई, तुझी अशी
मी गाईन रोज
गाणी
माझी तुझ्या
दुधाने गेली
भिजून वाणी
!
|