दिव्यत्वाची
जेथ प्रचिती
तेथे कर माझे
जुळती
गाळुनिया भाळीचे
मोती
हरिकृपेचे मळे
उगवती
जलदांपरी येउनिया
जाती
जग ज्यांची
न करी गणती
यज्ञी ज्यांनी
देउनि निजशिर
घडिले मानवतेचे
मंदिर
परी जयांच्या
दहनभूमिवर
नाहि चिरा नाही
पणती
जिथे विपत्ती
जाळी, उजळी
निसर्ग-लीला
निळी काजळी
कथुनि कायसे
काळिज निखळी
एकाची सगळी
वसती
मध्यरात्रि
नभघुमटाखाली
शांतिशिरी तम
चवऱ्या ढाळी
त्यक्त, बहिष्कृत
मी ज्या काळी
एकांती डोळे
भरती
|