मग माझा जीव
तुझ्या वाटेवर
वणवणेल !
अन् माझी हाक
तुझ्या अंतरात
हुरहुरेल !
मी फिरेन दूर
दूर तुझिया
स्वप्नांत चूर;
तिकडे पाऊल
तुझे उंबऱ्यात
अडखळेल !
विसरशील सर्व
सर्व आपुले
रोमांचपर्व
पण माझे नाव
तुझ्या ओठांवर
हुळहुळेल !
सहज कधी तू
घरात लावशील
सांजवात;
माझेही मन तिथेच
ज्योतीसह थरथरेल
!
जेव्हा तू नाहशील,
दर्पणात पाहशील,
माझे अस्तित्व
तुझ्या आसपास
दरवळेल !
जेव्हा रात्री
कुशीत माझे
घेशील गीत,
माझे तारुण्य
तुझ्या गात्रांतुन
गुणगुणेल !
मग सुटेल मंद
मंद वासंतिक
पवन धुंद;
माझे आयुष्य
तुझ्या अंगणात
टपटपेल !
|