या वाऱ्याच्या बसूनी विमानी सहल करुया गगनाची
चला मुलांनो आज पाहूया, शाळा चांदोबा गुरुजींची
आज पौर्णिमा जमले तारे आकाशाच्या वर्गात
चांदोबा गुरुजी तर दिसती अपुल्या मोठ्या तोऱ्यात
हसून चांदण्या करीती किलबील अपुल्या इवल्या डोळ्यांची
द्वितीयेपासून रोजची येती गुरुजी उशीरा शाळेत
मुले चांदणी फुलती आणिक सगळी अपुल्या गमतीत
कधी वर्गातून पडते उल्का, ओढ लागुनी पृथ्वीची
कुणी तेजाचे ओठ हलवूनी मंगळास वेडावित असे
रागाने मग मंगळ गोरा गोरा होत असे
बघुनी सारे हसता हसता उडते टंगळ ताऱ्याची
कधी वेळेवर कधी उशीरा, अमावस्येला पूर्ण रजा
राग कधी ना या गुरुजींना, कधी कुणा ना करीती सजा
असे मिळाया गुरुजी आम्हा करू प्रार्थना देवाची
गीत
-
संगीत
-
स्वर
-