देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा
उघड दार देवा आता, उघड दार देवा

पिते दूध डोळे मिटूनी, जात मांजराची
मनी चोरट्याच्या का रे भिति चांदण्याची
सरावल्या हातांनाही कंप का सुटावा

उजेडात होते पुण्य, अंधारात पाप
ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप
दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा

स्वार्थ जणु भिंतीवरचा आरसा बिलोरी
आपुलीच प्रतिमा होते, आपुलीच वैरी
घडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा

तुझ्या हाती पांडुरंगा तिजोरी फुटावि
मुक्तपणे भक्ती माझी तुझी तू लुटावि
मार्ग तुझ्या राऊळाचा, मला तो कळावा

भलेपणासाठी कोणी बुरेपणा केला
बंधनात असुनी वेडा जगी मुक्त झाला
आपुल्या सौख्याचाही करील तो हेवा
 
 
गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - सुधीर फडके
चित्रपट - आम्ही जातो अमुच्या गावा (१९७२)
राग - भूप, नट (नादवेध)
 
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.