नच सुंदरि करूं कोपा । मजवरि धरिं अनुकंपा ।
रागानें तव तनु ही पावत कशि कंपा ॥

नारी मज बहु असती ।
प्रीती परि तुजवरती ।
जाणसि हें तूं चित्तीं ।
मग कां ही अशि रीती ।
करिं मी कोठें वसती ।
तरि तव मूर्ती दिसती ।
प्रेमा तो मजवरिचा नेऊं नको लोपा ॥

करपाशीं या तनुला ।
बांधुनि करि शिक्षेला ।
धरुनीयां केशांला ।
दंतव्रण करि गाला ।
कुचभल्ली वक्षाला ।
टोंचुनि दुखवीं मजला ।
हचि दंड योग्य असे सखये मत्पापा ॥
 
 
गीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वर - छोटा गंधर्व
नाटक - संगीत सौभद्र (१८८२)
राग - पिलू (मूळ संहिता)
ताल - दादरा
चाल - बिडोरंगा ह्यरळू
For the printable version of this song, click here.