सांग कधी कळणार
तुला भाव माझ्या
मनातला !
रंग कधी दिसणार
तुला लाजणाऱ्या
फुलातला ?
गंधित नाजुक
पानांमधुनी,
सूर छेडिते
अलगद कुणी
अर्थ कधी कळणार
तुला, धुंदणाऱ्या
सुरातला ?
निळसर चंचल
पाण्यावरती,
लयीत एका तरंग
उठती
छंद कधी कळणार
तुला, नाचणाऱ्या
जलातला
जुळता डोळे
एक वेळी, धीट
पापणी झुकली
खाली
खेळ कधी कळणार
तुला, दोन वेड्या
जीवातला
|