लाविते मी निरांजन
तुळशीच्या पायापाशी
।
भाग्य घेऊनिया
आली आज धनत्रयोदशी
॥
आली दिवाळी
दिवाळी, पहाटेच्या
त्या आंघोळी
।
घरोघरी जागविते
माय मुले झोपलेली
॥
घरोघरी दीपज्योती
वरसाचा मोठा
सण ।
क्षणोक्षणी
होते आई आज
तुझी आठवण
॥
चार वरसांमागे
होता हात तुझा
अंगावरी ।
कधी नाही जाणवली
हिवाळ्याची
शिरशिरी ॥
आज झोंबतो अंगाला
पहाटेचा थंड
वारा ।
कुठे मिळेल
ग आई तुझ्या
मायेचा उबारा
॥
तुझ्यामागुती
बाबांनी दुःख
दाखविले नाही
।
त्यांच्या पंखात
वाढलो तुझा
भाऊ आणि ताई
॥
तुझ्याविना
आई घर सुनेसुनेसे
वाटते ।
आणि दिवाळीच्या
दिशी तुझी आठवण
होते ॥
सासरीच्या या
संसारी माहेराची
आठवण ।
आठवती बाबा
भाऊ आणि दारीचे
अंगण ॥
अंगणात पारिजात
कोण देई त्याला
पाणी ।
दारी घालते
रांगोळी माझ्यावाचून
का कोणी ॥
आई तुझ्या पायापाशी
घोटाळते माझे
मन ।
जिथे उभे अंगणात
तुळशीचे वृंदावन
॥
दारापुढं लिंबावर
साद घालतो कावळा
।
कोण येणार पाहुणा
आतुरला जीव
भोळा ॥
शेजारच्या घरातली
दळणाची घरघर
।
अजूनही येती
कानी आठवणीतून
स्वर ॥
आमच्या ग दरावरनं
घोड्यांच्या
गाड्या गेल्या
।
भावांनी बहिणी
नेल्या बीजेसाठी
॥
|