पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली !

मला आठवेना... तुला आठवेना ...
कशी रात गेली कुणाला कळेना
तरीही नभाला पुरेशी न लाली !

गडे हे बहाणे, निमित्ते कशाला ?
असा राहू दे हात माझा उशाला
मऊमोकळे केस हे सोड गाली !

कसा रामपारी सुटे गार वारा
मला दे उशाशी पुन्हा तू उबारा
अता राहू दे बोलणे, हालचाली !

तुला आण त्या वेचल्या तारकांची
तुला आण त्या जागणाऱ्या फुलांची
लपेटून घे तू मला भोवताली !
 
 
गीत - सुरेश भट
संगीत - रवि दाते
स्वर - सुरेश वाडकर
For the printable version of this song, click here.