माती सांगे
कुंभाराला पायी
मज तुडविसी
तुझाच आहे शेवट
वेड्या माझ्या
पायाशी !
मला फिरविसी
तू चाकावर
घट मातीचे घडवी
सुंदर
लग्नमंडपी कधी
असे मी, कधी
शवापाशी !
वीर धुरंधर
आले गेले
पायी माझ्या
इथे झोपले
कुब्जा अथवा
मोहक युवती,
अंती मजपाशी
!
गर्वाने का
ताठ राहसी ?
भाग्य कशाला
उगा नाससी ?
तुझ्या ललाटी
अखेर लिहिले
आहे मीलन माझ्याशी
!
|