घरदिव्यात मंद
तरी
बघ, अजून जळते
वात;
उजळल्या दिशा,
सजणा,
न कळताच सरली
रात !
झाडता झडेना
या
लोचनातली पण
धुंद
सर्व रात्रभर
निजला,
जिवलगा, कळीत
सुगंध !
जवळपास वाटेने
सुभग चालली
कोणी
वाजते तिच्या
भरल्या
घागरीतले पाणी
निवळले, तरी
दिसतो
पुसट एक हा
तारा;
बघ, पहाटचा
सुटला
मधुर उल्हसित
वारा !
झोप तू : मिठीमधला
अलग हा करू
दे हात;
उलगडू कशी पण
ही
तलम रेशमाचि
गाठ ?
|